नाशिक, १७ ऑक्टोबर : मालेगावहून कळवणच्या दिशेने जात असलेल्या माध्यमिक शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र सूर्यवंशी (४२, रा. नवलाने, ता. जि. धुळे) असे या मृत शिक्षकाचे नाव असून, ते बोरगाव ता. सुरगाणा येथील धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक होते. त्यांचे कुटुंब कळवण येथे स्थित असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचावड- निंबोळा रस्त्यावर शिवनाल्याजवळ निंबोळा शिवारात मालेगावहून कळवणच्या दिशेने जाणाऱ्या बुलेटला (एमएच १५ एचके ७४५६) मागून येणाऱ्या इको कार (एमएच ०५ डीएच ३०६६) ने जोरदार धडक दिली व तेथून सदर कारचालक फरार झाला. या अपघातात बुलेटस्वाराच्या छातीस व तोंडाला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत चिंचावड (ता. मालेगाव) येथील पोलीसपाटील संदीप खैरनार यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, या अपघाताबाबत देवळा पोलिसांत अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे गवळी करत आहेत.
