सातारा, 1 जानेवारी (हिं.स.) : 2023 सालाला गुडबाय करत 2024 ची पहाट उजाडली. नव्या वर्षाच्या स्वागताने आणि सातारकरांनीही या नववर्षाचे हर्ष उल्हासात स्वागत केले. मात्र अशीही साताऱ्याची तरा आणि अनोखा सातारी बाणा यावर्षी राजवाडा परिसरात पाहायला मिळाला. सातारा शहरातील सुप्रसिद्ध अशा सतीश रावखंडे यांच्या सतीश खारेदाणे स्टॉलवर त्यांच्या विक्री व्यवसायाला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज सर्व सातारकरांना सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत मोफत खारेदाणे खाऊ घालण्याचा अनोखा सातारी बाणा सतीशरावांनी वापरला.
सकाळपासूनच या राजवाडा बस स्थानक परिसरातील स्टॉलवर सातारकरांनी हे खारेदाणे घेण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या व्यवसायात अतिशय कष्ट आणि अल्पमजुरी मधून पुढे येत येत त्यांनी व्यवसायाची अनोखी शिखरे पदाक्रांत केली. विविध पुरस्कारांना गवसणी घालत सतीश रावखंडे यांनी आपल्या खारेदाणेची एक वेगळी चव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशा आणि परदेशातही नेली. आज केवळ साताऱ्यात त्यांच्या खारादाणा, वाटाणा, फुटाणा याचे दहा स्टॉल विक्री करत असून माझ्या व्यवसायासाठी मदत केलेल्या सातारकरांसाठी मी एक वेगळी भेट मी सातारकरमध्ये येणार याची माहिती ते गेले आठवडाभर देत होते.
एक तारखेला सकाळी दहा ते रात्री दहा या आणि भरपूर मोफत खारेदाणे भेट घ्या असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला, आणि पुष्पगुच्छ ,मनापासून शुभेच्छा देत सतीश रावखंडे यांच्या खारादाणा या पदार्थाची चव विक्रमी वाटचाल करू दे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार
