मुंबई, 14 ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांचे भावनिक आणि सामाजिक हित जपण्यासाठी समर्पित असलेल्या अधाता ट्रस्ट या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने आपला ११वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सकारात्मक वृद्धत्वास प्रोत्साहन देणे आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ज्येष्ठांना सक्षम करणे हे आपले ध्येय पुढे चालू ठेवण्याचा ट्रस्टतर्फे यावेळी निर्धार करण्यात आला.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने, ‘अधाता ट्रस्ट’ने ‘बदलती नाती – एक संगीतमय प्रवास’ या संकल्पनेवर आधारीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले. बदलत्या समाजातील वृद्धांच्या विकसित होत असलेल्या धारणांचा अभ्यास या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. बॉलीवूडमधील काही कालातीत अशा गाण्यांद्वारे या धारणा सुंदरपणे चित्रित करण्यात आल्या. १४हून अधिक केंद्रांमधील ज्येष्ठ सदस्यांनी या प्रसंगी उत्तम सादरीकरण केले.
‘अधाता ट्रस्टचे’ संस्थापक अरुण नंदा यांनी संस्थेच्या या महत्त्वाच्या टप्प्याविषयी आपले विचार मांडले, ते म्हणाले, अधाता ट्रस्टचा अकरावा वर्धापनदिन साजरा करणे हा ज्येष्ठांना सक्षम बनवण्याच्या आणि वृद्धत्वाची नव्याने व्याख्या करण्याच्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे. वय हा केवळ एक आकडा असतो, खरे तर जीवनाचा पूर्ण क्षमतेने उपभोग घेण्याची ही एक संधी असते, यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही एकत्रितपणे, मोठ्या आनंदाने आणि शहाणपणाने वृद्ध होण्याचा प्रवास साजरा करत राहू आणि चैतन्यपूर्ण पद्धतीने हा सुवर्णकाळ पूर्ण करण्याची सर्वांना प्रेरणा देत राहू.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात ‘अधाता’ची १३ केंद्रे आहेत. लवकरच पनवेलमध्ये आणखी एक केंद्र सुरू होणार आहे. या सर्व ठिकाणी पाचशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरीक या संस्थेचे सदस्य आहेत. भारतातील वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि त्यांची अनोखी आव्हाने व गरजा यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ट्रस्टतर्फे दरवर्षी जागतिक वृद्ध दिन साजरा केला जातो. आपल्या विविध उपक्रमांद्वारे वृद्ध व्यक्तींचे जीवन सुधारणे, त्यांना आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत करणे हे अधाता ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पोषक आणि आश्वासक वातावरण तयार करण्याचा प्रयत्नही अधाता करते. आपल्या सदस्यांचा वृद्धत्वाचा प्रवास साजरा करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधाता काही मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यामध्ये या सदस्यांचे कुटुंबीय आणि मित्रही सहभागी होऊ शकतात.
दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन जगभरात साजरा केला जातो. या वर्षी “वृद्ध व्यक्तींसाठी मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणांची अंमलबजावणी करणे : पिढ्यानपिढ्या” ही संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवून दिली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या अमूल्य योगदानाची ओळख करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची दखल घेण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
