सोलापूर 1 जानेवारी (हिं.स) माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. 2019 ला भाजपचे रणजितसिंह नाईक निबांळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. यावेळी म्हणजे 2024 च्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेकजण इच्छूक आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, 2019 च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुंसडी मारली होती. रणजितसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला होता. मात्र, आता या दोघांमध्ये सगळं काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळं या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत गाठी भेटी सुरु केल्या आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार
