रत्नागिरी, 22 जानेवारी, (हिं. स.) : सातत्याने सायकलिंगसंदर्भात प्रबोधन करत विविध स्पर्धा, उपक्रम, फेरी आयोजित करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आज अयोध्येतील श्री राम मंदिर स्थापना व राममूर्ती प्रतिष्ठापना म्हणजे संकल्प ते सिद्धी सोहळ्यानिमित्त सायकल फेरी काढली.
रत्नागिरीतील मारुती मंदिर ते राम मंदिर या मार्गावर काढलेल्या या फेरीत अनेक सायकलपटू सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. सियावर रामचंद्र की जय, प्रभू श्रीरामाचा जयजयकार असो, भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देत मारुती मंदिर येथून सकाळी ७ वाजता फेरीला सुरवात झाली. आयटीआय, नाचणे, छत्रपतीनगर, साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारुती मंदिर, माळनाका, एसटी स्टॅंडमार्गे बाजारपेठेतील श्री राम मंदिरापर्यंत फेरी काढण्यात आली.प्रत्येक सायकलवर भगवे झेंडे झळकले होते. रस्त्याने जाताना प्रत्येक ठिकाणी भेटणाऱ्या सर्व व्यक्तींनी सायकलपटूंचे कौतुक करत जय श्रीराम जय श्रीराम असे म्हणत प्रतिसाद दिला. इमारतींमधील रहिवाशांनीही क्लबचे कौतुक केले. राम मंदिर येथे फेरी पोहोचल्यानंतर तेथे मंदिराचे विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी सर्व सायकलपटूंचे स्वागत करून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार
