* पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडियाचे सहकार्य
पालघर, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडियाने नुकताच सर्वांगीण ग्रामविकास उपक्रमाच्या प्रभावाबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील लोकांचा विकास, शाश्वतता आणि समुदायाच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणार्या उपाययोजना राबविल्या जातात. या अहवालात जलस्रोत विकास, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांद्वारे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कंपनीची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे. कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्वांगीण ग्रामविकास उपक्रमाची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली, आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील १७ गावांमध्ये याचा विस्तार झाला आहे.
ग्रामीण भागातील लोकांच्या विकासाला चालना देण्यासाठी पॅनासोनिकच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक बदल घडून आले आहेत. शेतीचे प्रमाण वाढले असून, त्यातून प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. शेतमाल विक्रीतून प्रति कुटुंब ३० हजार ते १.३ लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे लोकांचे हंगामी स्थलांतर कमी झाले आहे. पिण्याचे पाणी लोकांना घराजवळ किंवा सहजपणे उपलब्ध करून देण्यात आल्याने महिलांना दूरवर जाऊन पाणी आणण्याचे कष्ट आणि वेळ वाचला आहे. त्यामुळे त्या हा वेळ शेतात कामावर जाण्यासाठी देऊ शकत आहेत. महिलांना स्वयं-सहायता बचतगटही सुरू केले असून, त्याद्वारे त्यांनी आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत तयार केला आहे. शुद्ध, स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेमुळे लोकांचे आरोग्यही सुधारले आहे. त्यामुळे त्यांना इतर कामांवर लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या जबाबदाऱ्या अधिक कुशलतेने पार पाडणे शक्य झाले आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना, पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडियाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक तोशिनोबू कावासाकी म्हणाले की, “अशा प्रकारच्या विकास प्रकल्पाचा आदिवासी गावांमधील लोकांच्या आरोग्यावर आणि एकूणच जीवनमानावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी कंपनी अशा समुदायांना दत्तक घेणे आणि उपजीविकेसाठी शाश्वत मार्ग निर्माण करण्यासाठी मदत करण्याचे काम सुरूच ठेवेल. यासाठी कंपनीची सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर हा महत्त्वाचा आधारस्तंभ असला, तरी लोकांचे जीवनमान सुधारणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
