नाशिक, ०१ जानेवारी (हिं.स.) : हैदराबादच्या श्री बालाजी फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेने नागरिकांना १२ हजार रुपये भरून सबसिडीसह दोन लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवण्याची तक्रार प्राप्त होताच संस्थेच्या नाशिक येथील कार्यालयात शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला,
दहा ते हजार रुपये गुंतवल्यावर त्यावर दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याची योजना राबवून शेकडो नागरिकांकडून पैसे गुंतवून घेत बेहिशेबी आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार यातून उघड होतो आहे. पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात पोलिसांनी धाड टाकून हे प्रकरण उघड केले. याप्रकरणी कार्यालयाच्या प्रमुख महिला अधिकाऱ्यासह काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी व प्रकरणाची पडताळणी सुरू आहे. राजूर बहुला येथील तीन महिलांनी फसवणूक झाल्याचा दावा करून आर्थिक गुन्हे शाखेत अर्ज केला होता. त्यानुसार गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी आर्थिक गुन्हे शाखेला तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी (दि. ३०) रात्री कंपनीच्या कार्यालयात धडकले. तिथे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील श्री बालाजी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या नावे कार्यालय असल्याचे दिसले. तेथील कागदपत्रे हस्तगत करून संशयित कर्मचाऱ्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. मात्र, आर्थिक त फसवणूक, त्यासंदर्भात दस्तावेज, कंपनीची योजना व कागदपत्रांची पडताळणी व चौकशी सुरू आहे. दरम्यान, शेकडो नागरिकांनी या योजनेत रक्कम भरल्याचा अंदाज असून, लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
हिंदुस्थान समाचार
