अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.) : चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून निसर्गाने चिखलदर्याला भरभरून दिले आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून याबरोबरच चिखलदऱ्याला लागूनच व्याघ्र प्रकल्प व मोठ्या प्रमाणात जंगल तसेच वनवैभव लाभल्याने महाराष्ट्रासह देशभरातील व जागतिक दर्जाचे पर्यटक सुद्धा चिखलदर्यात येतात. या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने व सिडको कंपनीने या ठिकाणी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पर्यटकांसाठी स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला व त्याचे 80 ते 90 टक्के काम पूर्णही झाले. मात्र मागील दोन वर्षापासून विविध कारणाने या प्रकल्पाचे काम बंद आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून स्थानिकांना सुद्धा या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावणार असून त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना सुद्धा या प्रकल्पापासून रोजगार मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प व्हावा, अशी जनसामान्यांची भावना आहे. या प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी छोट्या-मोठ्या उद्योगांची या ठिकाणी उभारणी केली आहे; परंतु मागील दोन वर्षापासून स्कॉयवॉकचे काम बंद असल्यामुळे व्यवसायिकांची निराशा होताना दिसत आहे.
हिंदुस्थान समाचार
