नाशिक, १७ डिसेंबर (हिं.स.) : घरात घुसलेल्या दोन तोतया किन्नरांना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत त्यांना पोलिसांच्या हवाली केले. जेल रोड परिसरात बनावट किन्नरांचा सुळसुळाट झाला आहे. काही दिवसांपूर्वी सातभाई संकुलात दोन बनावट किन्नरांचा भंडाफोड केला होता. घरात घुसून जबरदस्तीने पैसे मागणे, विचित्र हावभाव करणे, असा त्रास या किन्नरांकडून होत असतो. शनिवारी पुन्हा असा प्रकार घडला. दोन किन्नर सकाळी साडेदहाच्या सुमारास दसक येथील सिद्धेश्वरनगरमध्ये राहणारे अनुप दिलीप बहोत यांच्या घरात घुसले. त्यावेळी घरात महिलाच होत्या. किन्नरांनी पैशांची मागणी केली. घरात किन्नर घुसल्याचे कळताच बहोत घरी पोहोचले. त्यांनी या किन्नरांना पकडून घराबाहेर आणले. त्यावेळी रस्त्यावर त्यांना बेदम चोप दिला. परिसरातील नागरिकही जमा झाले. त्यांनीही किन्नरांना चोप दिला. त्यांना उपनगर पोलिसांच्या हवाली केले. बहोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा किन्नरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हिंदुस्थान समाचार
