नवी दिल्ली, अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने बुधवारी आपला उमेदवार जाहीर केलाय. या मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर 2019पासून नवनीत राणा भाजपसोबत होत्या. त्यामुळे यंदा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. या चर्चेवर अखेर आज शिक्कामोर्तब झालं असून भाजपने राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावतीतून भाजपच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीतील घटकपक्षांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राणा यांना उमेदवारी दिल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला होता. तसेच नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले होते. यामध्ये प्रवीण पोटे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण महल्ले, निवेदिता चौधरी, चेतन पवार, किरण पातुरकर आणि रवींद्र खांडेकर यांचा समावेश होता. परंतु, स्थानिकांच्या विरोधाकडे कानाडोळा करीत भाजप नेतृत्वाने नवनीत राणा यांच्यावर विश्वास दाखवत आज, बुधवारी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
