नवी दिल्ली, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना फेमा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी 28 मार्च रोजी दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आहे.अधिकृत सूत्रांनी आज, बुधवारी ही माहिती दिली. पैसे घेऊन संसदेत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल महुआ मोईत्रांची डिसेंबरमध्ये खासदारकी रद्द करण्यात आली होती.
ईडीने महुआ मोईत्रा आणि व्यापारी दर्शन हिरानंदानी यांना परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) उल्लंघन प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) 23 एप्रिल रोजी महुआ मोईत्रा यांच्याकडे छापेमारी केली होती. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला होता की महुआ मोइत्रा यांनी दुबईतील उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना रोख रक्कम आणि भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेत आरोप करण्यास सांगितले होते. महुआने अदानी समूहाविरोधात प्रश्न विचारून हिरानंदानींना फायदा करून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.सूत्रांनी सांगितले की काही व्यवहार आणि निधी हस्तांतरणाव्यतिरिक्त, अनिवासी बाह्य (एनआरआय) खात्यांचा समावेश असलेले व्यवहार ईडीच्या स्कॅनरखाली आहेत. दुसरीकडे, मोइत्रा यांनी दावा केला आहे की, त्यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे.
