नागपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वयंसेवकांच्या त्याग आणि परिश्रमावर उभा राहिल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील पांडे ले-आऊट परिसरातील कै. दत्ताजी डिडोळकर स्मृती भावनच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कमल बोंडे, रमेश मंत्री, अशोक डिडोळकर आणि सुधीर दप्तरी उपस्थित होते.
यावेळी सरसंघाचालक म्हणाले की, बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे शीला घाटे परिसरात आकाराला आलेल्या कै. दत्ताजी डिडोळकर स्मृती भवनाशी आपटे, घाटे आणि डिडोळकर अशा तीन त्यागमूर्तींची नावे जोडली आहेत. या तिघांची व्यक्तीमत्त्वे वरपंगी भिन्न असली तरी अंतःकरणातील देश, समाज आणि संघ उभारणीची भावना आणि त्यासाठी केला त्याग व परिश्रम सारखेच असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी संघाचे प्रचारक हाती कुठलेही संसाधन आणि सुविधा नसतानाही केवळ देशप्रेमातून आपले सर्वस्व अर्पण करत असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब आपटेंची आठवण सांगताना सरसंघचालक म्हणाले की, बिहारमध्ये बिकट परिस्थितीत बाबासाहेब आपटे यांना बक्सर येथून पाटणा येथे जायचे होते. हिंसाचार, गोळीबार यामुळे बस आणि रेल्वे सेवा स्थगित होत्या. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी एका नावाड्याला कसेबसे तयार करवून बक्सर ते पाटणा असा प्रवास पुराने ओसंडून वाहणाऱ्या गंगा नदीतून केला. पुराने ओसंडून वाहणारी गंगा नदी आणि त्यात एका छोट्या होडीत बाबासाहेब आपटे आणि नावाडी असे दोघेच या दृष्याची कल्पनाही अंगावर शहारे आणते. परंतु, आव्हाने आणि परिश्रम हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. त्याकाळात पैशांची अडचण असल्यामुळे बाबासाहेब आपटे कानपूरहून लखनऊला पायी चालत जात असत अशी आठवण यावेळी सरसंघचालकांनी सांगितली. दत्ताजी डिडोळकरांचा योगदानावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, दत्ताजी तामिळनाडूत प्रचारक असताना विवेकानंद स्मारक ज्या शिळेवर उभे आहे तेथे ख्रिस्ती धर्मियांनी त्यांचा क्रॉस लावला होता. दत्ताजींनी केरळच्या स्वयंसेवकांना मदतीला बोलावले. त्या स्वयंसेवकांनी रात्रीच्या अंधारात समुद्रातून पोहून जात तेथील क्रॉस हटवला होता. त्यानंतर तेथे विवेकानंदांची भव्य स्मारक उभे राहू शकल्याचे डॉ. भागवत म्हणाले.
आपल्याकडे व्यक्तीपूजेला स्थान नसले तरी कर्तृत्ववान माणसाचे स्मरण म्हणून भवनांना त्यांचे नाव दिले जाते. येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे स्मरण रहावे आणि प्रेरणा घेता यावी हा त्यामागचा हेतू असतो. वर्तमान काळ संघाला अनुकूल असला तरी आजवरची वाटचाल सुगम्य नव्हती. कदाचित संघाच्या जन्म पत्रिकेत खडतर प्रवास आणि परिश्रम लिहीले आहेत असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. परंतु, विविधरंगी व्यक्तीमत्वांनी एकत्र येऊन केलेले परिश्रम आणि दिलेले योगदान याबाळवर अशी स्मारके उभी राहतात. तेव्हा या स्मारकासोबतच आपली जबाबदारी वाढली असून पूर्वसुरींचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन डॉ. भागवत यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार भारतीचे आशुतोष अडोणी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
हिंदुस्थान समाचार
