पुणे 17 ऑक्टोबर : ससून रुग्णालयातून मेफेड्रॉनची विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी सात आरोपींची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत. अमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाली आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.
या आरोपींमध्ये समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित ऊर्फ, रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख आणि गोलू (तिघेही रा. मुंबई) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील व त्याचे साथीदार नाशिक येथील ‘एमआयडीसी’मध्ये ज्या कारखान्यात मेफेड्रॉन तयार करत होते, तो कारखाना कांबळे याचा आहे. शिंदे हा मेफेड्रॉन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवीत. पंत, जिशान आणि पंडित हे मेफेड्रॉन तयार करत, तर इम्रान आणि गोलू हे दोघे तयार झालेल्या अमली पदार्थांची विक्री करत, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.
