अकोला, 21 जून (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. अकोला शहरात आणि जिल्ह्यात गंभीर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. प्रकाश जोसेफ असं मृतकाचे नाव आहे. जुन्या पैशाच्या वादातून आरोपी पवन मोरे याने मृतकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केलीय. अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाबाई आंबेडकर नगरात हत्येची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून गुंडगिरी वाढली आहे. एकापाठोपाठ एक हत्याकांडाच्या घटना अकोल्यात घडताना समोर येत आहे. दरम्यान, हत्याकांड सत्र सुरूच आहे. दारूच्या नशेत पुन्हा एक जीव गमावल्याची घटना जुने शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जुने शहरात शिवीगाळातून सुरुवात होऊन थेट डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश पप्पू जोसे आणि पवन विलास मोरे हे दोघेही एकमेकांच्या घरा शेजारी राहणारे आणि कुठलीही काम सोबत करणारे दोघेही मित्र आणि वेळोवेळी एकत्र बसून दारू पिणारे असे मित्र होते.. मात्र, प्रकाश दारू झाली की तो पवन शिवीगाळ करायचा… हे नेहमीच असायचं याचीच पुनरावृत्ती मध्यरात्री झाली. प्रकाश पुन्हा एकदा दारू पिऊन आला आणि दारूच्या नशेत पवनच्या घरासमोर गोंधळ घालून शिवीगाळ करू लागला. लाभोपाठोपाठ शिव्यांचा वर्षाव पचवू न शकल्याने पवनचा आता संयम सुटला आणि दोघा मित्रांमध्ये वाद झाला. वादातून हाणामारी झाली. अशातच झालेल्या वादातून पवनने जवळच पडलेला मोठा दगड उचलून थेट प्रकाशच्या डोक्यात घातला. प्रकाश रक्ताच्या थारोळात कोसळला आणि रक्तरंजित होऊन घटनास्थळी जागीच त्याचा मृत्यू झाला. परिसरातील काही नागरिक पहाटे पाच वाजता उठले आणि मृतदेह पाहतच त्यांनी त्वरित जुने शहर पोलिसांना माहिती दिली. या दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय शहर पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
——————-
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे
