धुळे, 23 डिसेंबर (हिं.स.) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. अहवा (गुजरात) कडून वार्सा (ता. साक्री) कडे जाणार्या या दोन वाहनांसह ४१ लाख ५५ हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल शेंदवड (ता. साक्री) गावाजवळ हॉटेल कोकणी दरबारजवळून ताब्यात घेण्यात आला असून पिंपळनेर येथील तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून एमएच ४१ एजी २४७२ या पिकअपसह एमएच २४ एएफ ०४९३ या इको कारला शेंदवड गावशिवारात अडविण्यात आले व वहनातील व्यक्ती विचारपूस करण्यात आली. यावेळी पंकज कैलास भोई, रामजतन अवधराम प्रजापती व रविंद्र साबळे तिन्ही रा. पिंपळनेर (ता. साक्री) हे वाहनांमध्ये आढळले त्यांच्या वाहनातील साहित्याची तपासणी केली असता, वाहनांमध्ये विमल पानमसाला व तंबाखू असा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला माल पोलीसांच्या हाती लागला. या मालासह पोलीसांनी दोन्ही वाहनेही ताब्यात घेतली.
हिंदुस्थान समाचार
