अमरावती, 8 ऑक्टोबर – शेतातील केबल वायर चोरणाऱ्या एका त्रिकुटाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह एकुण ४.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मेहफुज बेग मेहमुद बेग (३१), असलम शाह करीम शाह (३२) व आमीन शाह हयाद शाह (२४, तिघेही रा. अचलपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर अन्य एक आरोपी फरार आहे.
जिल्हयात मागील काही दिवसात शेतातील केबल वायर, मोटर पंप, स्प्रिंकलर व शेती संबधीचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे निदर्शनास येताच पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी ते गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार हे पथकासह ग्रामीण भागात केबल वायर चोरणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेत होते. ७ ऑक्टोबर रोजी मेहफुज बेग याने परतवाडा येथे त्याच्या पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहनात शेतातील चोरलेल्या केबलमधील तांबा तार लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने परतवाडा गाठून त्या वाहनाची झडती घेतली. त्यात अर्धवट जळालेली तांब्याची तार सापडली. मेहफुज बेग याला ताब्यात घेऊन त्याला विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
सात गुन्हे उघड
आरोपींनी दिलेल्या कबुलीवरुन शिरजगाव (कसबा), चांदुरबाजार व आसेगाव पुर्णा पोलीस ठाण्यात नोंद एकुण सात गुन्हे उघडकीस आले. आरोपींना शिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किरण वानख यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाटे, शांताराम सोनोने, चालक संजय गेठे यांनी ही कार्यवाही केली.
