
चंद्रपूर 29 डिसेंबर (हिं.स.): बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या विविध सामन्यात विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत असल्याने स्पर्धेत आता चांगलीच चुरस वाढली आहे.
आज मुली व मुलांच्या १९ वर्षाखालील गटातील थाळी फेक, गोळा फेक, तिहेरी उडी, बांबू उडी, १५०० मीटर, ४०० मीटर व १०० मीटर धावण्याची स्पर्धा, ४ X १०० रिले, ५००० मीटर चालने (मुले), ३००० मीटर चालने (मुली) या स्पर्धेच्याअंतिम सामन्यात खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत विजय मिळविला. तर प्रथम फेरीसाठी ८०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर अडथळ्याची शर्यत, गट-अ व गट-ब च्या पात्रता फेरीसाठी भाला फेक, थाळी फेक, लांब उडी च्या सामन्यातही स्पर्धेत चांगलीच रंगत आली.
शुक्रवारी झालेल्या विविध अंतिम सामन्यात १९ वर्षाखालील मुलांच्या गटातील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या जेसन जेम्स कॅस्टेलीनो याने ११.०३ सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. आंध्रप्रदेशच्या वल्लीगी हिमतेजा याने ११.१५ सेकंदात द्वितीय तर महाराष्ट्राच्याच दुर्वेश पवार याने ११.२३ सेकंदाची वेळ नोंदवित तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटातील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कौन्सिल फॉर द इंडियन स्कूलच्या सिया सावंत ने ११.६५ सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या अलिझा मौला आणि तामिळनाडूच्या अभिनया आर. यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावला. यात अलिझाने १२.१७ सेकंद, तर अभिनयाने १२.३१ सेकंदाची वेळ नोंदवली.
मुलांच्या गटातील ५००० मीटर चालण्याची शर्यत हरयानाच्या सचिनने २०.२६.१५ मिनिटांमध्ये पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या नितीन गुप्ता आणि राजस्थानच्या सचिन गहरवाल यांनी द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावला. यात नितीनने २०.२७.८६ मिनिटे, तर सचिन ने २०.३९.११ मिनिटांची वेळ नोंदवली. मुलींच्या गटातील ३००० मीटर चालण्याच्या शर्यतीत राजस्थानच्या खुशबू यादव ने १३.५२.२९ मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. तर हरयानाच्या पायल आणि राजस्थानच्या कवीता दुडी यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. यात पायलने १४.२५.५१ मिनिटे, तर कवीताने १४.३६.१८ मिनिटांची वेळ नोंदवली.
हिंदुस्थान समाचार
