नवी दिल्ली, 23 सप्टेंबर, (हिं.स.)रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय लीग T20 आणि ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसेल. अश्विनने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या वर्षी २७ ऑगस्ट रोजी त्याने इंडियन प्रीमियर लीगमधूनही निवृत्तीची घोषणा केली होची.
अश्विनने १ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या आयएलT20 लिलावासाठी नोंदणी केली आहे. तो म्हणाला की, मी लिलावासाठी नोंदणी केली आहे. मला आशा आहे की, सहा फ्रँचायझींपैकी एकाने मला घेण्यास उत्सुकता दाखवली आहे. आयएल-T20 २ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान युएईमध्ये होणार आहे.
यानंतर अश्विन ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. बीबीएल २५ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. पण व्यस्त वेळापत्रकामुळे तो संपूर्ण बीबीएल हंगामासाठी उपलब्ध राहणार नाही. सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर, होबार्ट हरिकेन्स आणि ऍडलेड स्ट्रायकर्स सारख्या संघ अश्विनला त्यांच्या बीबीएल संघात समावेश करण्यास उत्सुक आहेत.
आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर त्याला परदेशी लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तो आता अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट आणि इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये देखील सहभागी होऊ शकतो.
या प्रमुख स्पर्धांपूर्वी अश्विन ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अश्विन म्हणाला, या फॉरमॅटसाठी वेगळी रणनीती आवश्यक आहे आणि ती खूप रोमांचक असेल.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
