नाशिक, २९ डिसेंबर (हिं.स.) :-एका युवकाकडून ६० हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा अंबड पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की अरबाज फिरोज शेख (वय २४, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) याच्याकडे बंदी असलेला नायलॉन मांजा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता अंबड परिसरातील सनशाईन हॉटेलच्या मोकळ्या मैदानात अरबाजकडे ६० हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून, अरबाज शेखविरुद्ध पोलीस अंमलदार घनश्याम भोये यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिरवले करीत आहेत. पक्षी, प्राणी आणि मानवी जीवितास धोका असल्याने नायलॉन मांजाला सर्वत्र बंदी आहे. मात्र छुप्या पद्धतीने शहरात नायलॉन मांजाची विक्री होताना आढळून येत आहे.
पोलीस याबाबत सतर्क असून, नायलॉन मांजांविरुद्धची मोहीम राबवीत आहेत. ठिकठिकाणी पोलीस तपासणी करीत असून, नायलॉन मांजा आढळणा-या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
