नाशिक, १६ डिसेंबर, (हिं.स.) – नाशिकमध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात केडन्सने निर्णायक विजय मिळवला तर, नाशिक व ॲमबिशिअसला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.
एस एस के क्रिकेट मैदानावर नाशिकने पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत सांगली विरुद्ध सहाव्या क्रमांकावरील आर्यन घोडकेचे शतक व रुद्राक्ष मालवियच्या ५८ धावांच्या जोरावर २७५ धावा केल्या. आर्यनला आठव्या क्रमांकावरील प्रिन्स पटेलने दोन तासापेक्षा जास्ती वेळ ८५ चेंडू खेळून छान साथ देत ९० धावांची भागीदारी केली. सांगलीच्या शंभुराजे मोहितेने ३ गडी बाद केले. सांगलीला उत्तरा दाखल नाशिकच्या मंथन पिंगळे ५ व कर्णधार नील चंद्रात्रेच्या ४ बळींमुळे ११५ धावांपर्यंतच मजल मारता आली. आर्यन घोडकेचने १ गडी बाद केला. फॉलो ऑन नंतर, दुसऱ्या डावात मात्र सांगलीने १६० धावांची पिछाडी भरून काढत ७ बाद २२६ धावा करत नाशिकला निर्णायक विजय मिळवून दिला नाही. त्यात पहिल्या डावातही ५० धावा करणाऱ्या सांगलीच्या सलामीवीर दीप जाधवने १०७ तर निहाल मुल्लाने ६० धावा केल्या. नाशिकच्या चैतन्य चव्हाणने ३ रुद्र मेणेने २ तर प्रिन्स पटेल व नील चंद्रात्रे यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.
दुसऱ्या सामन्यात महात्मानगर क्रिकेट मैदानावर केडन्सने पहिल्या डावात पिछाडीला पडूनही सावरत उस्मानाबादवर ७ गडी राखून विजय मिळवला. केडन्सच्या कर्णधार प्रसाद आंबलेने भेदक लेग स्पिन गोलंदाजीने सामन्यात एकुण १० गडी बाद करत विजयात प्रमुख वाटा उचलला. त्यास फलंदाजीत प्रतिक कडलगच्या ९८ धावांची साथ मिळाली. उस्मानाबादच्या मध्यमगती देवराज काळेने केडन्सच्या पहिल्या डावात ६ बळी घेतले.
तिसऱ्या सामन्यात एमसीसी क्रिकेट मैदानावर ॲमबिशिअसने सीएनएवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. ॲमबिशिअसतर्फे फलंदाजीत तेजस गिलबिलेने नाबाद ७० व ४२ धावा केल्या. गोलंदाजीत एका डावात अर्जुन साळुंकेने ४, आर्यन चौहानने ४ व ३ तर तन्मयराजे जाधवने ३ बळी घेतले. सीएनएच्या श्रेयशने ६२ धावा करत फलंदाजीत तर, वेदांत पाटीलने डावात ४ व शौर्य देशमुखने ३ बळी घेत गोलंदाजीत चमक दाखवली.
हिंदुस्थान समाचार
