बंगळुरु, 11 ऑगस्ट (हिं.स.)
आशिया कप २०२५ स्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. टीम इंडिया आपले विजेतेपद राखण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पण या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष केवळ नेट प्रॅक्टिस किंवा रणनीतीवरच नाही तर क्रिकेटपटूंच्या फिटनेस रिपोर्टवर देखील आहे. विशेषतः हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यासारख्या महत्त्वाच्या क्रिकेटपटूंचा फिटनेस संघाचे संतुलन आणि रणनीती ठरवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.
भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्यासाठी पुढील ४८ तास खूप महत्वाचे आहेत. त्याची फिटनेस टेस्ट बंगळुरूच्या एनसीए येथे होणार आहे. हार्दिक पंड्या आधीच तिथे पोहोचला आहे आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना त्याची माहिती देखील दिली आहे. आता तो फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होतो की नाही हे पाहायचे आहे.
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. २७ ते २९ जुलै दरम्यान झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये खेळला होता. पण आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे आशिया कप संघात त्याच्या पुनरागमनाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला आणखी एक आठवडा लागू शकतो. तो सध्या एनसीएमध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि फिजिओच्या देखरेखीखाली आहे. जूनच्या सुरुवातीला त्याचे हर्निया ऑपरेशन झाले होते.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
