मुंबई, 19 ऑगस्ट (हिं.स.) आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय निवड समितीने १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलने उपकर्णधार म्हणून आशिया कप संघात प्रवेश केला आहे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांना संघात स्थान मिळालेले नाही. अय्यरची निवड होईल अशी बरीच चर्चा होती. पण निवड समितीने त्याला दुर्लक्षित केले आहे. याशिवाय तरुण वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यांनाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. हर्षित राणा यांनाही वेगवान गोलंदाजीत स्थान मिळाले आहे. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान परागचा राखीव क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला
आहे.
श्रेयसची संघात अनुपस्थिती आश्चर्यकारक आहे. आयपीएलमध्ये श्रेयसनए चांगली कामगिरी केली होती. आणि त्याने त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेले होते. हे सर्व असूनही, संघ निवडीत त्याला दुर्लक्षित करण्यात आले. पत्रकार परिषदेद्वारे संघाची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुख्य निवडकर्ता अजित आगरकरसह उपस्थित होता. पत्रकार परिषदेदरम्यान, श्रेयसला संघात स्थान का मिळाले नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आगरकर म्हणाले, यशस्वी जयस्वालचा प्रश्न आहे, तो दुर्दैवी आहे. अभिषेक शर्माने त्याचे काम कसे केले आहे ते तुम्ही पाहता आणि तो गोलंदाजी देखील करू शकतो, म्हणून यशस्वीला वाट पहावी लागेल. श्रेयस अय्यरच्या बाबतीतही असेच आहे. त्याची चूक नाही. आम्हाला फक्त १५ क्रिेकेटपटू निवडण्याची संधी मिळाली होती. जर जागा असती तर आम्ही निश्चितच श्रेयसला संघाचा भाग बनवले असते.
आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा तिसऱ्यांदा टी-२० स्वरूपात खेळवली जाणार आहे. यापूर्वी २०१६ आणि २०२२ मध्ये आशिया कप टी-२० स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. आयसीसी स्पर्धांप्रमाणेच आशिया कपमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा दिसून येत आहे. १४ सप्टेंबर रोजी दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
