अहमदनगर, 16 ऑक्टोबर : नगर सोलापूर रोडवरील चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल येथे विभागीय ज्युदो आणि धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सीबीएसई बोर्डाच्या महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,तेलंगणा,कर्नाटक, केरळ या राज्यातील शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान ज्युदो आणि २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान धनुर्विद्या स्पर्धा रंगणार आहेत.दोन्ही स्पर्धात जवळपास १६०० खेळाडू सह भागी होणार आहेत.त्यांची निवास व्यवस्थाही चित्रकुट मार्फत केली जाणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय चौहान आणि सीईओ अशोक सचदेव यांनी दिली.
चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलमधील खेळासाठी पोषक अशा पायाभूत सुविधा आणि वातावरण लक्षात घेऊन सीबीएसईने मोठ्या स्पर्धेचे यजमानपद शाळेला दिले आहे. विभागीय ज्युदो स्पर्धा ११ ते १९ या वयोगटात होणार आहे.स्पर्धेसाठी १५ पंच आणि एक निरीक्षक नियुक्त असेल.ज्युदो साठीचे मॅट तसेच इतर आवश्यक गोष्टींची तयारी शाळेने केली आहे.धनुर्विद्या स्पर्धा ११ ते १७ वर्षे वयोगटात होईल.या स्पर्धेसाठी १५ पंच आणि १ निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत,अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक संतोष खैरनार यांनी दिली.नगरमध्ये चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला सलग दुसऱ्या वर्षी धनुर्विद्या विभागीय स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.शाळेचा तब्बल ७ एकरचा परिसर असून सर्व आवश्यक सोयी सुविधा परिसरात आहेत.या स्पर्धेमुळे नगरच्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या खेळाचा अनुभव मिळणार आहे.
