रत्नागिरी, 3 डिसेंबर, (हिं. स.) : समीक्षा सामाजिकतेत रुजलेली असते. साहित्य हे सांस्कृतिक रणभूमीचे चित्रण असते. समीक्षा हा वाङ्मयातील दुर्लक्षित प्रांत आहे. १९७५ नंतर मराठी साहित्य बदलले; मात्र समीक्षा बदलली नाही. म्हणूनच समीक्षकांनी आता आपले हत्यार परजले पाहिजे, अशी हाक वंदना भागवत यांनी दिली.
प्रगतिशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात ‘मराठी समीक्षेची सद्यःस्थिती’ या परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवताना त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर दिलीप चव्हाण, उदय रोटे होते.
अलीकडच्या काळात साहित्यात आणि समीक्षेत तुच्छतावाद बोकाळला असल्याचे म्हणत भागवत यांनी व्यवस्थेच्या कोंडीत सापडलेला लेखक अखेर लिहून लिहून काय लिहू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी उद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीचे उदाहरण दिले. समीक्षा करणे म्हणजे केवळ भलावण करणे किंवा शेरेबाजी करणे अपेक्षित नसून, निर्मळता ही बौद्धिकतेतून आलेली गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
उदय रोटे म्हणाले की, मराठीतील समीक्षेने सर्वांना कवेत घेऊ शकेल असे कुठलेही काम केले नाही. म्हणून मराठी समीक्षा जुन्या चौकटीत अडकून पडली. तिने आपली आधीची परिभाषा बदलली नाही. खरे तर समीक्षकाने व्यापक अर्थाने कठोर आणि निर्मळपणे चिकित्सा करणे गरजेचे आहे.
भारतात प्राचीन काळापासून चिकित्सेच्या विरोधातील परंपरा टिकून राहिली असल्याचे सांगत श्री. रोटे यांनी नवशिक्षित समाज आणि समीक्षक चिकित्सेसाठी चांगल्या अर्थाने पात्र असतील असेही नाही, तर समीक्षक म्हणजे लेखकांचे प्रेशितांमध्ये मांडणारा एजंट असल्याचे मत मांडले.
दिलीप चव्हाण यांनी तौलनिकदृष्ट्या मराठीत अस्सल समीक्षेचा विचार कुणी मांडला नसल्याचे नमूद करत समीक्षा विचार का विकसित करू शकत नाही, मोठे समीक्षक कोणता नवा विचार देतात, असे प्रश्न उपस्थित केले.
हिंदुस्थान समाचार
