सोलापूर , १३ जानेवारी (हिं.स.) बाजार समितीत मागील चार दिवसांपासून तब्बल तीन हजार ६६३ गाड्या (३ लाख ६६ हजार ४८८ क्विंटल) कांद्याची आवक झाली आहे. तत्पूर्वी, डिसेंबरमध्ये देखील १९ लाख क्विंटल कांदा विकला गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवक असतानाही कांद्याची निर्यातबंदी कशासाठी असा प्रश्न बळिराजा विचारू लागला आहे.
दुष्काळी स्थितीमुळे कांद्याचा पेरा कमी झाला आणि उत्पादनात मोठी घट होईल, देशांतर्गत बाजारपेठेत कांदा कमी पडू शकतो म्हणून केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला. पण, वास्तव खूपच वेगळे असून कृषी विभागाकडील नोंदीपेक्षाही जास्त कांद्याची लागवड झाली आहे. त्यामुळे सध्या बाजारात भरमसाट कांदा येत आहे. निर्यातबंदीपूर्वी क्विंटलसाठी साडेचार हजार रुपयांचा दर होता. मात्र, निर्णयाच्या दुसऱ्याच दिवसापासून दरात निम्म्याने घट झाली. ८ डिसेंबरपासून लाखो क्विंटल कांद्याची एकट्या सोलापूर बाजार समितीत विक्री झाली. भाव मात्र सरासरी १४०० ते १६००च्या वर गेलेला नाही. उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि सध्याचा भाव, यामध्ये मोठी तूट जाणवत आहे. कांद्याचे पडलेले दर, दुष्काळ, अवकाळीसह इतर अडचणींमुळे सध्या बळिराजाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत.
हिंदुस्थान समाचार
