ठाणे, ७ ऑक्टोबर, (हिं.स) – नागरी संरक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई या राज्यस्तरीय महाविद्यालयाची स्थापना दि.10 सप्टेंबर 1963 रोजी करण्यात आली. ही महाराष्ट्र राज्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या या महाविद्यालयास नुकतीच 60 वर्षे पूर्ण झाली.
या महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीत शांतताकालीन मदतीचे प्रशिक्षण, पूर बचाव, अग्निशमन, रेल्वे/रस्ते अपघात मदतकार्य, प्रथमोपचार, रासायनिक आपत्ती व बचाव कार्य इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम चालविले जातात. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेले स्वयंसेवक मनुष्य निर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती काळात सशस्त्र दल, वैद्यकीय सेवा किंवा पोलिस दल यांना मदत करतात. नैसर्गिक आपत्तीपासून जीव व मालमत्तेचे संरक्षण करणे, नुकसान कमी करणे, औद्योगिक उत्पादनात खंड न पडू देणे व नागरिकांचे मनोबल उंचाविणे, अशा प्रकारचे मौलिक प्रशिक्षण या महाविद्यालयामार्फत देण्यात येते. हे संपूर्ण प्रशिक्षण शासनाकडून विनामूल्य दिले जाते.
या महाविद्यालयामध्ये लाखो सामान्य नागरिक, सरकारी व खाजगी संस्था तथा आस्थापनेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून, आपत्ती काळामध्ये प्रथम प्रतिसादक (First Responder) तयार करण्याचे महत्वपूर्ण प्रशिक्षण कार्य या महाविद्यालयामार्फत राबविण्यात येते, जेणेकरून राज्य शासन तथा स्थानिक प्रशासनास आपत्ती काळात सर्वतोपरी मदत करता येईल.
हिंदुस्थान समाचार
