नांदगाव (प्रतिनिधी): पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने
मुलाच्या मदतीने मद्यपी पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ५) रात्री घडली. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील मद्यपी संजय गायकवाड पत्नीला सतत मारहाण करीत असल्याने संतापलेल्या संशयित उषा गायकवाड व अविनाश गायकवाड यांनी संजय गायकवाड यांचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील संशयित मायलेकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायडोंगरी येथील संजय गणेश गायकवाड दारू पिऊन पत्नी उषा व मुलगा अविनाश यास नेहमी मारहाण करीत होता. संजय दारू पिऊन घरी आल्यानंतर उषा व त्याच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणात संजय याने उषा हिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीचा नेहमीचाच त्रास असलेल्या उषाने संतापाच्या भरात संजय गायकवाड यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर एका बाजूने मुलगा अविनाश याच्या मदतीने व स्वत: दुस-या बाजूने नायलॉनच्या दोरीने संजयचा गळा आवळून खून केला. यावेळी संजयची आई मीराबाई ममराज राठोड ही घटनास्थळी उपस्थित होती. तिने घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत संशयित उषा गायकवाड व मुलगा अविनाश गायकवाड यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मयत संजय गायकवाड याची आई मीराबाई ममराज राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलीस ठाण्यात संशयित उषा व अविनाश दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
