अमरावती, साधारणतः २५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, त्या अनुषंगाने आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी खासगी शाळांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांना शाळेत प्रवेश देण्याच्या उद्देशाने खासगी शाळेचे शिक्षक एकमेकांवर कुरघोडी करत पालकांच्या दारी जाऊन विद्यार्थी देता का विद्यार्थी? म्हणून शिक्षक पालकाच्या घरी जाऊन मनधरणी करीत असल्याचे चित्र शहरी भागासह ग्रामीण भागातील पहावयास मिळत आहे.
विद्यार्थिसंख्या वाढविण्याच्या शिक्षणसंस्थानी शिक्षकांच्या खांद्यांवर जबाबदारी दिली आहे. दिवसेंदिवस सामान्य पालकांची ओढ ही मोठमोठ्या खासगी शाळा संस्थेत आपल्या मुलांच्या प्रवेश व्हावा हीच इच्छा असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. शाळाच्या तुकड्या आणि शिक्षकाची पदे टिकवायची असेल तर विद्यार्थिसंख्या वाढणे जबाबदारी शिक्षकांवर लोटली असते. परिणामी आजच्या घडीला प्रत्येक खासगी शाळेतील शिक्षक हे उन्हातान्हात वेगवेगळे आपले गट तयार करून गावात जाऊन विद्यार्थी कुठे आहे म्हणून शोध घेत असतात. जेणेकरून त्यांना पटसंख्या जोडण्याची फर्मान संस्थाचालकाकडून सोडली आहे.
