रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : आडिवरे नवेदर (ता. राजापूर) येथील प्रगतिशील शेतकरी मारुती लक्ष्मण भोवड (वय ७८) यांचे निधन झाले.
मारुती भोवड हे गावच्या सामाजिक कार्यात कार्यरत आणि प्रयोगशील शेतकरी होते. मनमिळावू स्वभावाचे आणि गावात सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित होते. ग्रामीण भागात राहून त्यांनी आपल्या मुलांना समाजसेवेचा वसा दिला. विविध सामाजिक क्षेत्रात हिरीरीने काम करणारे रवींद्र भोवड यांचे ते वडील होते.
गेले दोन महिने ते आजारी होते. ते उपचारांना प्रतिसाद देत होते. परंतु अचानक त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. नवेदर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आडिवरे, रत्नागिरीसह विविध भागांतील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हिंदुस्थान समाचार
