रत्नागिरी, 22 ऑक्टोबर, : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या झाडगाव (रत्नागिरी) येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात बंदिस्त खेकडा पालन : व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशीष मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. मोहिते यांनी खेकडे संवर्धन संच पद्धतीमध्ये खेकडे पालन हे कमी जागेत व कमी पाण्यात केले जात असल्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यास चांगली संधी असल्याचे सांगितले. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक कल्पेश शिंदे यांनी केले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. हरीष धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, डॉ. संतोष मेतर, प्रा. सचिन साटम, वर्षा सदावर्ते, रमेश सावर्डेकर उपस्थित होते.
प्रशिक्षणाला हिंगोली, मुंबई, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, वसई, रत्नागिरी, गोवा तसेच कर्नाटकातील प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणात खेकडा पालन संच हाताळणी व व्यवस्थापन, खेकडा पालनाची सद्यःस्थिती व वाव, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र, प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणीपश्चात काळजी तसेच विक्री व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी स्वतः खेकड्याचे खाद्य तयार करून संचातील खेकड्यांना खाद्य देण्याचे, तसेच खेकडे पकडून ते दोरीने बांधण्याचे प्रात्यक्षिक अनुभवले.
कार्यक्रम आयोजनाकरिता कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
