ठाणे, 3 नोव्हेंबर, (हिं.स) आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून सुमारे २०० महिलांना रोजगार मिळतो.
दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाण्यात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नौपाडा येथे आमदार केळकर यांच्या हस्ते व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत फराळ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे संचालक संतोष साळुंखे, परिवहन सदस्य विकास पाटील, पंढरीनाथ पवार उपस्थित होते.
कोलशेत, माजिवडे, ब्रह्मांड, हावरे सिटी आणि राबोडी येथे केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दीड हजार किलो फराळ विक्री करण्यात आला होता. तर सुमारे १२ लाखांची उलाढाल १० ते १२ दिवसांत झाली होती. यातून प्रत्येक महिलेस १५ ते २० हजाराचे उत्पन्न मिळाले होते अशी माहिती आ. केळकर यांनी बोलताना दिली.
आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकास परिवार ही संस्था महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. अनेक महिला बचत गट या संस्थेशी निगडीत असून परिवाराच्या माध्यमातून अनेक रोजगाराभिमुख उपक्रम राबवले जातात.
हिंदुस्थान समाचार
