नाशिक, २२ ऑक्टोबर, – शिरसगाव प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसरपंचांचा भ्रमणध्वनीवर चक्क शिविगाळ केली. उपसरपंचांनी याबाबतची ऑडीओ क्लीप रेकाॅर्ड करून हरसुल पाेलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विराेधात तक्रार दिल्याने पाेलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
शिररगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्राथमिक आराेग्य केंद्राबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याने उपसरपंच भगवान रामदास महाले यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रफुल्ल वसावे यांना भ्रमणध्वनीवर विचारणा केली. परंतु त्यांनी लाेकप्रतिनिधींना अपशब्दात बाेलून त्यांचा अपमान केला. यामुळे महाले यांनी हरसुल पाेलिस ठाण्यात तक्रार केल्याने पाेलिसांनी डाॅ. वसावे यांच्याविराेधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार केली. यावेळी ग्रामस्थही माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
शिरसगाव प्राथमिक आराेग्य केंद्रात दुरूस्तीची कामे करण्यात आली आहे. मात्र, ही कामे निकृष्ट असल्याने ग्रामस्थांनी तक्रार केली हाेती. त्यानुसार सरपंच व ग्रामसेवकांना ग्रामस्थांनी अर्ज करून २०१६ ते २०२२ या पर्यंत करण्यात आलेल्या दुरूस्तीच्या कामांची माहिती ग्रामसभेवर ठेवण्याची मागणी केली आहे. आत्तापर्यंत करण्यात आलेला खर्च व किती वेळा दुरूस्ती केली याची माहिती लेखी स्वरूपात ग्रामसभेवर मांडण्याची मागणी केल्याने वादास प्रारंभ झाला असल्याची चर्चा आहे.
