नवी दिल्ली, फेब्रुवारी : देशातील हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज, मंगळवारी मतदान झाले. यात 15 पैकी 10 जागांवर भाजप विजयी झाली आहे. यात उत्तरप्रदेशातून 8, हिमाचल आणि कर्नाटकातून भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झालाय. तर उत्तरप्रदेशातून समाजवादी पक्षाला 2 आणि कर्नाटकातून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत.
देशातील 12 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 56 जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी 41 उमेदवार अविरोध निवडून आले होते. तर कर्नाटकच्या 4, उत्तर प्रदेशच्या 10 आणि हिमाचलप्रदेशची एक अशा 15 जागांसाठी आज, मंगळवारी मदतान झाले. यात उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपने 8 जागा जिंकल्या तर सपाला 2 जागांवर समाधान मानावे लागले. कर्नाटकच्या 4 जागांपैकी काँग्रेस 3 आणि भाजप एका जागेवर विजयी झाली. सर्वात चुरशीची निवडणूक हिमाचलप्रदेशात झाली. येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत असूनही काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. हिमाचलप्रदेशात काँग्रेसच्या 9 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपचे हर्ष महाजन विजयी झालेत. काँग्रेस सत्तेत असूनही अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हिमाचलप्रदेशाच्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खु म्हणाले की, एकूण 9 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे. यात 3 अपक्ष आणि 6 काँग्रेस आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यांच्या या वर्तनामुळे आम्ही स्तब्ध आहोत. हिमाचलप्रदेशची ही संस्कृती नसल्यामुळे आमदारांनी असे का केले हा प्रश्न सतावत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
