
मुंबई, ३ जानेवारी (हिं.स.) : मुंबईहून १९९० साली कारसेवेकरिता गेलेल्या ९६ वर्षीय रामभक्त शालिनी रामकृष्ण डबीर यांच्या घरी जावून राष्ट्रीय सेवक संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी श्रीमती डबीर यांना २२ जानेवारी होणाऱ्या रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या अक्षता कलशाबरोबरच प्रभू श्रीराम मंदिराचे सुबक मॉडेल भेट म्हणून दिलीप गोडांबे यांच्या हस्ते देण्यात आले.
श्रीमती डबीर या ३० ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येत पोहोचून बाबरी ढाच्यावर भगवा फडकवण्याच्या मुख्य साक्षीदार आहेत. कारसेवेमध्ये दिलीप गोडांबे यांनीही सहभाग घेतला होता. दादरच्या कारसेवक महिलांच्या जथ्याला अटक करून उत्तरप्रदेश पोलिसांनी एका शाळेच्या आवारात बंदिस्त केले होते. त्यापैकी काहींनी स्थानिकांच्या मदतीने पलायन करून अंदाजे ५० किलोमीटर पायपीट करत ३१ ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवेमध्ये सहभाग घेतला. श्रीमती डबीर यांना यावेळी पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूर एवढेच नाही तर आसपास होत असलेल्या गोळीबाराचा देखील अनुभव आला. मात्र, त्यावेळी कोणीही डगमगले नाही. यावेळी सत्कारादरम्यान गजानन पेंडसे, मनोज मिसाळ, संगिता पवार आणि छाया गोडांबे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
