सोलापूर, 06 फेब्रुवारी (हिं.स.) विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन मुलतानी बेकरी व फ्लोअर मिलचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय ५९) यांनी आत्महत्या केली. याची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सुनील सदारंगानी हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते. आता ते सोलापुरातच स्थायिक होणार होते. राजकुमार राठी यांचे ते जावई होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत व दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. अमेरिकेतील मुलगा सोलापूरला यायला निघाला आहे.
खराडी (पुणे) येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलास घटनेची माहिती कळविण्यात आली. रात्री उशिरा ते सोलापुरात दाखल झाले होते.आकस्मित मयत म्हणून विजापूर नाका पोलिसांत नोंद झाली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर सदारंगानी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटचे १० मजले पूर्ण झाले असून, सात मजले अर्धवट स्थितीत आहेत. सदारंगानी यांनी गाडी पनाश अपार्टमेंटच्या उघड्या गेटमधून आत नेली. गाडी तेथे थांबवून ते अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर चढले. आत्महत्येसाठी त्यांनी ‘पनाश’ अपार्टमेंटच का निवडले, हे गुलदस्त्यातच आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
