* २०२४ हे वर्ष ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष’ म्हणून होणार साजरे
मुंबई, 4 जानेवारी (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर मुक्तता झाली. त्या घटनेला ६ जानेवारी २०२४ या दिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हे वर्ष ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेच्या शताब्दी वर्षारंभाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार, ६ जानेवारी या दिवशी सकाळी ९ वाजता येरवडा कारागृह ते कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा’ आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावरकरप्रेमी होणार सहभागी
प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, निगडी अशा ठिकाणांहूनही अनेक हिंदू संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी घेऊन यात्रेत सहभागी होणार आहेत. बालगंधर्व चौक, कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे यात्रेचे स्वागत करण्यात येईल आणि फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ यात्रेची सांगता होईल. या यात्रेला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित (माजी पोलीस महासंचालक), कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, भाजपा नेते सुनील देवधर, मेधा कुलकर्णी, सावरकर व्याख्याते अभिनेता शरद पोंक्षे आणि अभिनेता रणदीप हुडा, तसेच राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच सावरकर स्मारक (मुंबई) येथेही त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त वाशी, ठाणे, मुलुंड अशा काही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात येईल.
सशस्त्र क्रांतिकारकांचे अग्रणी : स्वातंत्र्यवीर सावरकर
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. लाखो क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिल्यामुळे भारताने स्वातंत्र्य मिळवले. या सशस्त्र क्रांतिकारकांचे अग्रणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. १९२१ मध्ये अंदमानातून मुक्तता झाल्यावर सावरकरांना रत्नागिरी आणि त्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे ६ जानेवारी १९२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कारावासातून मुक्तता झाली. येरवडा कारागृहातून मुंबईला आणून ८ जानेवारी १९२४ या दिवशी सावरकरांना रत्नागिरीला नेण्यात येऊन स्थानबद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या १३ वर्षांच्या ‘समाजक्रांती पर्वा’चा प्रारंभ झाला.
हिंदुस्थान समाचार
