नागपूर, ९ जानेवारी, (हिं.स) कोणत्याही युद्धात जर तुम्ही धर्मरथावर आरूढ असाल तर कोणत्याही शत्रुकडून तुमचा पराभव होऊ शकणार नाही हा हितोपदेश गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित मानसमधल्या बिभीषण गितेत केला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत आणि श्री जगदंबा देवस्थान समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात तुलसी रामायणातील राम या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून एदलाबादकर बोलत होते. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना एदलाबादकर म्हणाले की बिभीषण गीतेत वर्णन केल्यानुसार ज्यावेळी रावण युद्धाला सज्ज होऊन आला त्यावेळी बिभीषणाने प्रभू रामचंद्राला विचारले की तुझ्याजवळ काहीही शस्त्र नाहीत आणि रावण तर शस्त्र सज्ज आहे अशावेळी तुम्ही कसे लढणार? त्याला उत्तर देताना प्रभू रामचंद्र आणि सांगितले की माझ्याजवळही धर्मरथ आहे, शौर्य आणि धैर्य ही त्याची दोन चाकी आहेत. सत्य आणि शील या ध्वजा आहेत. बल विवेक यमनियम आणि परोपकार हे चार घोडे आहेत. क्षमा कृपा आणि समता हे लगाम आहेत. परमेश्वराची भक्ती हा माझा सारथी आहे. वैराग्य हे माझे कवच आहे तर संतोष हे माझे कृपाण आहे. दान हे माझे परशु आहेत, तर बुद्धी ही माझी शक्ती आहे. अशा स्थितीत मी शस्त्रसज्ज नाही असे तू कसे म्हणू शकतोस बिभीषणा? असे सांगून प्रभू रामचंद्रांनी सांगितले की अशा स्थितीत कोणताही शत्रू माझ्यासमोर टिकणार नाही.
राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो हा संदेशही प्रभू रामचंद्रांनी यावेळी दिला आहे असे सांगून रामराज्यात आचार आणि विचार यांचे स्वातंत्र्य होते हे देखील रामचरितमानसात स्पष्ट केले आहे याकडे एदलाबादकर यांनी लक्ष वेधले. जर तुम्हाला रामराज्य हवे असेल तर राज्यातील रयतेनेही रामराज्यात जगण्यालायक व्हायला हवे हा संदेशही तुलसी रामायण दिला आहे असे एदलाबादकर म्हणाले. आपल्या व्यक्तिगत आयुष्याचा रथ, समाज रथ आणि राष्ट्राचा रथ हे सुचारू रुपाने चालवायचा असेल तर धर्माधिष्ठित वर्तन आवश्यक आहे असे मत यावेळी एदलाबादकर यांनी व्यक्त केले…
डॉ शरद निंबाळकर ..
प्रत्येक व्यक्तीला राम व्हायला आवडेल. मात्र त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील रावण बाजूला करून बाहेर फेकून देत आपल्यातील राम जागृत करावा लागेल असा संदेश प्रभु रामचंद्रांनी आपल्या कृतीतून दिला असे प्रतिपादन डॉ शरद निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
यावेळी बोलताना डॉ निंबाळकर म्हणाले की रावण हा देखील ब्राह्मण कुळातील होता. तो दशमुखी म्हणजेच दहा गुणांनी युक्त असा होता. मात्र अहंकार या दुर्गुणाने त्याला सर्व गमवावे लागले याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांनी या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली. जगदंबा देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनकरराव जोशी यांनी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन साहित्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ सुरुची डबीर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्वाती मोहरीर यांनी केले..
कार्यक्रमाला साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष लखनसिंह कटरे, महेश आंबोकर,निवृत्त मुख्य वनसंरक्षक राम इंदुरकर, ज्येष्ठ पत्रकार सोपान पांढरीपांडे, जगदंबा देवस्थान समितीचे सचिव चंद्रकांत शाह, अण्णा जातेगावकर प्रभृत्तींसह मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
