अमरावती, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी गुरुकुंज ता. तिवसा येथे साजऱ्या होणाऱ्या 55 व्या. पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजली कार्यक्रमाकरिता जाणाऱ्या गुरुदेव भक्तांच्या वाहनांना 01 नोव्हेंबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान टोल माफी देण्यात यावी अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिलेल्या पत्रातून केली आहे. मोझरी गुरुकुंज इथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा. पुण्यतिथी महोत्सव 27 ऑक्टोबर पासून सुरु झाला असून 03 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु असणार आहे. तसेच 02 नोव्हेंबरला मौन श्रद्धांजली व सामुदायिक प्रार्थना होणार आहे. विशेष म्हणजे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रात असून अत्यंत महत्वाच्या असलेल्या मौन श्रद्धांजली करिता राज्यातील काना-कोपऱ्यातून हजारो गुरुदेव भक्त या कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी अमरावती-नागपूर महामार्गाने जाणार आहे.
त्यादृष्टीने आ. ॲड. यशोमती ठाकूर यांनी हे पत्र देवून टोल माफीची मागणी करीत त्या म्हणतात की, असंख्य भाविक आपल्या वाहनाने जाणार असल्यामुळे व नांदगांव पेठ येथे टोल नाका असल्यामुळे या सर्व वाहनांना टोल नाक्यावरुन टोल न आकारका विनामूल्य वाहने सोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिलेल्या पत्रातून केली आहे.
हिंदुस्थान समाचार
