रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्टच्या मंचावर जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांसमवेत सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे गुरू आणि ज्येष्ठ रंगकर्मी, सिने अभिनेते सुहास भोळे यांची जाहिरात, चित्रपट, लघुपट निर्मिती कार्यशाळा प्रात्यक्षिकासह झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
श्री. भोळे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. स्क्रीनवर सादरीकरण करून त्यांनी सिने क्षेत्रातील प्राथमिक आणि अत्यावश्यक गोष्टी समजावून सांगितल्या. त्यावर आधारित काही प्रत्यक्ष कृती विद्यार्थ्यांना करण्यास दिली. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही अनुभवांची, विचारांची देवाणघेवाण केली. विद्यार्थ्यांनी आपापली केलेली कामे सादर केली. विद्यार्थी-पालक यांनी आपापले प्रश्न आणि मते व्यक्त केली. साध्या फोटोग्राफीपासून ते क्रिएटिव्ह चित्रफितीपर्यंत या शिबिरात माहिती दिली गेली. प्रामुख्याने हे शिबिर प्रि-प्रॉडक्शन—प्रॉडक्शन—पोस्ट-प्रॉडक्शनविषयी सखोल माहिती आणि अनुभव देणारे ठरले.
दोन दिवसांच्या या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धरमसीभाई चौहान यांनी केले. श्री. चौहान यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सन्मानपत्र सुहास भोळे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिज्ञासा थिएटर्सचे उपाध्यक्ष जादूगार विनयराज, इंजिनीअर विनायक भाटकर, सेवानिवृत्त शिक्षक विनायक हातखंबकर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. एडवी सर, विकास पेजे, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीकांतजी भुर्के, संतोष कुष्टे, अभिनेते आबा पेडणेकर, डेप्युटी इंजिनीअर उदय शिंदे, नीलिमा शिंदे, प्रा. प्रतीक्षा पांचाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा नियोजन प्रा. संदेश पालये यांनी केले. कार्यक्रमाला मंथनचे संचालक प्रा.शशिकांत गवळी यांनी शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार
