पुणे, फेब्रुवारी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविण्यासाठी व त्यांचे संचालन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ‘बालकांच्या सुरक्षेसाठी पालकांची भूमिका’ या विषयावर आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी व प्रतिनिधी तसेच रस्ते सुरक्षा, बाल लैंगिक शोषण व बाल सुरक्षा अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या ‘मुस्कान फाउंडेशन’ व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत काम करणाऱ्या ‘दामिनी पथक’ आणि ‘पोलीस मित्र’ यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते .
