* भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाला घात
अहमदाबाद, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : चहा पावडर निर्मिती क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या लोकप्रिय ‘वाघ बकरी चहा’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. आज, सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि कन्या परिषा असा परिवार आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून सावरताना पडल्यामुळे जबर जखमी होऊन त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबासह उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला जात असताना पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात ते घरासमोरच पाय घसरून ते पडले होते. यात जबर मार लागल्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. सुरक्षारक्षकाने कुटुंबीयांना माहिती देताच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर शेल्बी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना झायडस रुग्णालयात नेण्यात आले. सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु काल (रविवार, २२ ऑक्टोबर) सकाळी अहमदाबादमधील खासगी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जीवन परिचय
चहाप्रेमींमध्ये वाघ बकरी चहा फार प्रसिद्ध आहे. १८९२ मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली होती. जवळपास ५० दशलक्ष किलो या चहा पावडरचे वितरण होत आहे. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांत वाघ बकरीला विशेष पसंती आहे. पराग देसाई हे वाघ बकरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रस देसाई यांचे सुपुत्र होते. पराग यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधून एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केले होते. ते वाघ बकरी चहा व्यवसायातील चौथी पिढी होते. कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. कंपनीची दीड हजार कोटींची उलाढाल आहे. १९९५ मध्ये त्यांनी कारकीर्द सुरू केली. मात्र ऐन उमेदीच्या भरातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
हिंदुस्थान समाचार
