भंडारा २३ नोव्हेंबर (हिं. स.) : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मार्चपासून महिलांसाठी अर्धे तिकीट योजना सुरु केली. यामुळे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळी भाऊबीजेसाठी माहेरी जाणाऱ्या महिलांनी लालपरीतूनच प्रवास करण्यावर भर दिला आहे. प्रवासी संख्या वाढल्याने एसटीचे उत्पन्नही वाढल्याचे दिसून आले. दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या आणि परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानकावर बसचे आगमन होताच ती लगेच हाऊसफुल्ल भरली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. तर दिवाळी निमित्त प्रवाशांची गर्दी पाहता एस टी विभागाने ७ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तिकिटांच्या दरात १० टक्यानी वाढ केली आहे. तरी सुद्धा एस टी विभागाला आतापर्यंत ४ कोटी ५८ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस एस टी हाऊसफुल चालणार असून ६ कोटीच्या घरात उत्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हिंदुस्थान समाचार
