सोलापूर , 23 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावे, पावसामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर व समाधान देण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाकडे केली.
सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यास केलेला विरोध मागे घेतल्यानंतर आज लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा पंढरीत पार पडला. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही बुधवारी सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले होते. गुरुवारी नियोजित वेळेप्रमाणे पहाटे २.१५ वाजता सपत्नीक श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या महापूजेला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीसांची पंढरपुरात शासकीय महापूजा करण्याची, विठु-माऊलीचं सपत्नीक दर्शन घेण्याची ही सहावी वारी आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून चार वेळा आषाढी आणि उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी मिळाली आहे. आतापर्यंत सहा वेळा वारीसाठी आम्हाला विठ्ठल-रखुमाईच्या महापुजेची संधी दिली, त्याबद्दल त्यांनी मंदिर समितीचे आभार मानले. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागणं मागितलं. तसंच मागणं मी विठुरायाचरणी करतो, सर्वांना सुखी ठेवण्याची, समाधानी ठेवण्याची शक्ती माऊलीने आम्हाला द्यावी, असेही फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान, वारकरी बबन दादा घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्यास मानाचे वारकरी होण्याचा बहुमान मिळाला.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार यात्रा
वारीची ही प्रथा फार जुनी असून, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्य चार यात्रा (वार्या) पाहायला मिळतात. ज्यात, चैत्री यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा आणि माघी यात्राचा समावेश आहे. दरम्यान, कार्तिकी यात्रा म्हणजेच कार्तिकी एकादशी ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. असे म्हणतात की, शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन पाहायला मिळतात. या काळात संध्याकाळपासून संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते आणि एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. त्यानंतर पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
हिंदुस्थान समाचार
