रत्नागिरी, 8 ऑक्टोबर : वेरळ (ता.लांजा) गावचे सुपुत्र सचिन गुंड्ये सदिच्छा फाउंडेशनच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि विशेषत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोफत डबे पुरवण्याचे काम करत आहेत.
गुंड्ये व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकदा केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि आपल्या गावाकडील गोरगरीब जनतेची जेवण-खाण्याची होणारी हेळसांड त्यांनी पाहिली होती. गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी केईएम रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वखर्चाने मोफत टिफिन पुरवण्याचे काम सुरू केले. मात्र कामधंदा, व्यवसाय सांभाळून या सर्व गोष्टी करणे सहज सोपे नव्हते. म्हणूनच त्यांनी सदिच्छा फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेतर्फे सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हळूहळू आपल्या या कामाचा व्याप वाढवला. हे काम लक्षात घेऊन अनेकांनी त्यांना आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सदिच्छा फाउंडेशनने आजवर १०० हून अधिक रुग्ण व नातेवाईकांना मोफत डबा पुरवला आहे.
या कामात सचिव रूपेश बाराम, कांचन शिंदे, अजिंक्य नेमण, विनोद पारदले, विक्रांत वारीशे, ओमकार पाटोळे, राम वाडकर, अंकुश मेस्त्री, श्रुती खेडेकर, मंगेश गिजम, नेहा माळकर, प्रदीप जाधव, समृद्धी चव्हाण, संदेश गुरव, संतोष बावकर, विश्वनाथ मांडवकर, प्रदीप घडशी, दीनानाथ पाटोळे, सोनाली साटम, श्वेता गुट्टी, प्रमोद मसणे यांचे सहकार्य लाभते. या कार्यात वीणा घाडीगावकर, मनीष सावंत, धनंजय पाथरे, सुनील दांगट यांनी अर्थसाह्य केले.
