अमरावती, 16 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात बांगलादेश येथे निर्यात केली जाते. त्यामुळे बांगलादेशात जाणाऱ्या संत्रांवरील शुल्क हटविणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत संत्रा फळ पिकाचे वयोमर्यादेनुसार कोणतीही दोन वर्षात आंतर मशागती करीता अनुदान देण्याबाबत सोबतच सोयाबीन आणि मागील संत्रा फळीचे अनुदान मिळावे याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व संत्रा उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले व जोरदार नारेबाजी केली.
बांग्लादेश सरकारने आयात शुल्क वाढ केल्याने संत्रा निर्यात जवळपास बंद झाली आहे. नागपुरी संत्र्याकरीता बांगलादेश हा एकमेव आयात करणारा देश आहे. संत्रानियत झाल्यास स्थानीक बाजारपेठेत शेतकऱ्यांना संत्र्याला बऱ्यापैकी दर मिळतात, परंतु आता जवळपास निर्यात बंद झाल्याने स्थानीक बाजारपेठेत सुध्दा संत्र्याचे दर मोठया प्रमाणात पडले आहे. हवामानातील बदल दरवर्षी वाढती फळगळ, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा संत्रा उत्पादक शेतकन्यांना भरीव मदत करण्याकरीता उस उत्पादक शेतकन्यांच्या साखर निर्यतीला देत असलेल्या निर्यातीकरीता अनुदानाच्या धर्तीवर संत्रा निर्यातीकरीता अनुदान दयावे, तसेच मागील संत्राफळगळीचे अनुदान अजुन पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही तरी अनुदान मिळण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
या वेळी कक्षा बाहेर संत्रांचा ढीग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडला होता व जोरदार नारेबाजी ही या वेळी शेतकऱ्यांनी केली.मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्या कारणाने शेतकरी व कार्यकर्त्याना जिल्हाधिकारी यांच्या कक्षा बाहेरच पोलिसांनी थांबवले या वेळी काही वेळ पोलीस आणि प्रहार कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची ही झाली.सध्या सोयाबीन व कापुस पिक काढणी होऊन शेतकरी बाजारात विक्रीस आणत आहेत. परंतु ऐन सणासुदीच्या तोंडावर सदर पिकाचे दर पडले असून हमी भावापेक्षा अत्यंत कमी दरात खरेदी सुरु असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आधीच बदलत्या हवामानामुळे पावसाच्या अवेळेपणामुळे आधीच शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आता पडलेल्या पिकांच्या दरामुळे उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे सोयाबीन व कापूस पीकाचे शासनाकडून तातडीने खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी ही या वेळी शेतकऱ्यांनी केली.
सदर निवेदन देते वेळी संजय देशमुख,मंगेश देशमुख,प्रदिप बंड,प्रफुल नवघरे,सुभाष मेश्राम,रामदास भोजने सह अनेक संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
