पुणे, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या नवीन रस्त्यांवर महापालिका आता पथदिवे बसविणार आहे. तब्बल साडेतीन हजार पथदिवे बसविण्याचे काम येत्या सहा महिन्यांत केले जाणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसह समाविष्ट गावांमधील रस्त्यांवरील अंधार दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिकेत समाविष्ट ३२ गावांमधील रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणांवर पथदिव्यांचा अभाव आहे. त्याबाबत संबंधित गावांमधील नागरिकांनी पालिकेकडे मागणी करूनही उपाययोजना केली जात नव्हती. महापालिकेने समाविष्ट गावांसह शहरातील नवीन रस्त्यांवर पथदिवे बसविण्यासाठी २५ ते ३० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली आहे. त्यापैकी समाविष्ट गावांसाठी १८ कोटी रुपये तर, महापालिकेच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या नवीन रस्त्यांसाठी ७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
