केपटाउन, 14 ऑगस्ट (हिं.स.)। दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर जागतिक नेत्यांना “ग्लोबल आउटलुक कौन्सिल ऑन वॉटर इन्व्हेस्टमेंट्स” मध्ये परिषद सदस्य म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. ही G20 अंतर्गत नवीन जागतिक उपक्रम असून, यामध्ये जल गुंतवणुकीला जागतिक राजकीय आणि आर्थिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यावर भर दिला गेला आहे.
बुधवारी (दि.१३)केप टाउनमध्ये अफ्रिका वॉटर इन्व्हेस्टमेंट समिटचे उद्घाटन करताना रामाफोसा म्हणाले की, “जल गुंतवणुकीला आता पर्यावरण आणि आर्थिक चर्चेत दुर्लक्षित ठेवले जाणार नाही, तर तिला केंद्रस्थानी आणले पाहिजे.” रामाफोसा यांनी सांगितले की, ही परिषद अफ्रिका वॉटर इन्व्हेस्टमेंट प्रोग्रॅमचे जागतिक स्तरावर विस्तार करेल. त्यांनी स्पष्ट केले, “जल गुंतवणुकीला केवळ प्राधान्य नाही, तर तिचे योग्य निरीक्षण, मोजमाप आणि वित्तीय पाठबळ मिळाले पाहिजे.” या प्लॅटफॉर्मचा उद्देश G20, संयुक्त राष्ट्र (UN), बहुपक्षीय विकास बँका आणि खासगी क्षेत्र यांच्यासह भागीदारी करून जल गुंतवणुकीच्या प्रगतीचे परीक्षण करणे आणि त्यावर वार्षिक अहवाल सादर करणे हा आहे.
रामाफोसा यांनी या कौन्सिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इतर प्रमुख जागतिक नेत्यांची नावे जाहीर केली. यामध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती लुइझ इनासिओ लूला दा सिल्वा, मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबाउम, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज,ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन तसेच अफ्रिकेतील अनेक देशांचे नेते या परिषदेत सहभागी आहेत. ही परिषद जागतिक पातळीवर पाण्याच्या सुरक्षित आणि शाश्वत वापरासाठी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत राहणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
