पुणे, 5 ऑक्टोबर, (हिं.स) महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मैदानांसाठी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसल्याने अशा मैदानांचा रात्रीच्या वेळी मद्यपान तसेच नशा अशा अवैध कामांसाठी वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या खराडी येथील सर्वे क्र. 73 मधील खेळाच्या मैदानाच्या ठिकाणी महात्मा गांधीच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत शाळेच्या आवारात चक्क गांजाची झाडे आढळून आली. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह या भागातील माजी नगरसेवक, सामाजिक संस्था तसेच राजकीय कार्यकर्त्याच्या वतीने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी या मैदानात चक्क गांजाची झाडे मोठ्या प्रमाणात उगवल्याचे आढळून आले. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक युवक गांजा ओढत असल्याने त्यावेळी बिया पडून ही झाडे उगवली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या प्रकारामुळे महापालिकेच्या मैदानांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
हिंदुस्थान समाचार
