नाशिक, १४ नोव्हेंबर, (हिं.स.) – जीवन कसे जगावे याचे दर्शन ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रवचनांमधून मिळते. आजच्या सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करता सर्वांना सुख शांतीची गरज आहे. यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग निश्चितच फलदायी ठरतो. आजच्या समस्यांवर राजयोग व अध्यात्माद्वारे मात करता येऊ शकते. त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातून ब्रह्माकुमारी संस्थेशी अनेक साधक जुळत आहेत, असे मनोगत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले. येथील ब्रह्माकुमारी संस्थेचे मुख्य सेवा केंद्र प्रभू प्रासाद सभागृहात दीपावली कार्यक्रमाचा उत्सव मोठ्या हर्ष उल्हासने साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आ. हिरे बोलत होत्या. येथील ब्रम्हाकुमारी सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका वासंती दीदी जी अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलानाने करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, डॉक्टर राजेश जावळे ब्रह्माकुमारी शक्ती दिदी ब्रह्माकुमारी विना दिदी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, ब्रह्माकुमारी मिरा दिदी आदी मान्यवर उपस्थित होते.
जोपर्यंत आपण अंत:करणातून प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपण इतरांना काहीच देऊ शकत नाही. इतरांना किती दिले. यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील हास्य हे इतरांचे दुःख निवारण्याचे कारक होऊ शकते.
आपण अंतकरणातून जोपर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपण माणूस म्हणून जगायला लायक नाही. ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रातून खूप वेगळे काम करत आहे. ब्रह्माकुमारी संस्थेचे सर्व साधक सेवा वृत्तीने काम करत असतात असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभाग चे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय संबोधनात वासंती दीदीजी यांनी ईश्वरीय महावाक्यांचे पठण करीत दिवाळीचा संदेश देताना सांगितले की, आपण अंतर्मनात संतुष्ट राहिलो तर इतरही आपल्यापासून संतुष्ट होतील. साधकांनी येणाऱ्या सर्व समस्यांना ईश्वरीय स्मरणातून पार करीत सदा प्रसन्नचित राहावे असा मोलाचा संदेश दीदींनी या प्रसंगी दिला.
खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी सुद्धा सेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती होते व येथील प्रकंपन मनाला आल्हाददायक आहेत असे भावोद्गार काढले. ब्रह्माकुमारी विना दीदी यांनी गोडसे यांना मेडीटेशन द्वारे राजयोगाची अनुभूती करून दिली.
हिंदुस्थान समाचार
