मुंबई, १४ नोव्हेंबर (हिं.स.) : ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
EIH लिमिटेडचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ओबेरॉय ग्रुप फ्लॅगशिप, भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून त्यांना ओळखले जाते. “अनेक देशांमधील आलिशाम हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व पुरवण्याव्यतिरिक्त, पीआरएस ओबेरॉय यांनी ‘ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स’च्या विकासात पुढाकार घेतला.
ओबेरॉय यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२९ रोजी दिल्लीत झाला. त्यांना बिकी म्हणून ओळखले जात असे. त्यांचे वडील राय बहादूर मोहन सिंग ओबेरॉय हे ‘द ओबेरॉय ग्रुप’चे संस्थापक होते. पृथ्वीराज यांनी भारत, ब्रिटन आणि स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतले. १९५९ मध्ये गुड्डीसोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा विक्रम आणि मुलगी नताशा आहे. लग्नानंतर नताशा आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियात राहत आहे. पृथ्वीराज यांनी २०११ मध्ये घोषणा केली की, त्यांचा मुलगा विक्रम ओबेरॉय साम्राज्याचा वारस असेल आणि त्यांचा पुतण्या (मोठा भाऊ टिळक राज यांचा मुलगा) अर्जुन ओबेरॉय हॉटेल व्यवसाय व्यवस्थापित करण्यात मदत करेल. पृथ्वीराज यांची एकूण संपत्ती सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे.
हिंदुस्थान समाचार
